विराट, बुमराह, अश्दीप, हार्दिक पांड्या ठरले मॅचविनर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेवटच्या क्षणापर्यंत अत्यंत थरार उत्कंठावर्धक आणि प्रत्येक भारतीयाला प्रार्थना करायला भाग पडलेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर बाजी मारली. तब्बल ११ वर्षांनी आयसीसी ट्रॉफीवर आपली मोहोर उमटवली आणि दुस-यांदा टी २० विश्वचषकावर आपले नाव कोरले.
भारताने प्रथम फलंदाजी करून १७६ धावा बनवल्या होत्या. यात विराट कोहलीने अखेर स्वतःला सूर गवसल्याने अर्धशतक बनवले. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने सुरुवातीला क्विंटन डी कॉक आणि हेनरीच क्लासेन यांच्या मदतीने हे आव्हान पेलणार असेच दिसत होते. मात्र क्विंटन डी कॉक आऊट झाल्यावर क्लासेन सोबत मिलर धोकादायक ठरत होते.

दक्षिण आफ्रिकेला १७ व्या षटकात १५१ धावांवर पाचवा धक्का बसला. हार्दिक पांड्याने हेनरिक क्लासेनला यष्टिरक्षक पंतकरवी झेलबाद केले. त्याने २७ चेंडूत ५२ धावांची मॅच चेंजिंग इनिंग खेळली.
नंतर मात्र जसप्रीत बुमराहची नियंत्रित गोलंदाजी आणि हार्दिक पांड्याच्या बहुमूल्य तीन विकेट यामुळे भारतीयांचा विजय सोपा झाला. अखेरच्या चेंडूत भारत विजयी होताच सर्वत्र जल्लोष सुरू झाला.