पाचोरा येथील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील लोहारी येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याचा शेतात काम करीत असताना सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दि. १५ जून रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गोपाल विठ्ठल पाटील (वय ४७, रा.लोहारी, ता. पाचोरा) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. गोपाल यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत. शेती काम करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. शनिवारी दि. १५ जून रोजी ते सकाळपासून स्वताच्या शेतात कामानिमित्ताने गेले होते. शेतात काम करत असतांनाच त्यांना कोणत्यातरी सापाने दंश केला. त्यामुळे ते बेशुद्ध झाले. दुपारी ११ वाजता कुटुंबातील लोक शेतात गेले असता गोपाल पाटील झाडाखाली झोपलेल्या अवस्थेत आढळून आले. म्हणून जवळ जाऊन त्यांना उठवण्यासाठी प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
आजूबाजूच्या शेतातील शेतकऱ्यांनी त्यांना पाचोरा येथील रुग्णालयात तपासणीसाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती गोपाल पाटील यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. लोहारी गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.