अमळनेर (प्रतिनिधी):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना-2026 अंतर्गत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जमाफीच्या रकमेत वाढ करावी तसेच योजनेतील जाचक अटी रद्द कराव्यात, या मागणीसाठी अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांना सोमवारी निवेदन देण्यात आले.

यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष बी. के. सूर्यवंशी यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शासनाच्या कर्जमाफी धोरणाबाबत विविध मुद्दे मांडले. निवेदनात नमूद करण्यात आले की, विधानसभा निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र २ जून रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयात अनेक जाचक अटी व शर्तींचा समावेश करण्यात आल्याने मोठ्या संख्येने शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या प्रमुख मागण्या
काँग्रेस कमिटीने निवेदनाद्वारे पुढील मागण्या केल्या आहेत :
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा.
कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी.
२०१९ मध्ये कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही नव्या योजनेत समाविष्ट करण्यात यावे.
कर्जमाफीसाठी अतिरिक्त रक्कम बँक खात्यात भरण्याची अट रद्द करण्यात यावी.
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहन अनुदानात वाढ करण्यात यावी.
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक लाभ देण्यात यावा.
यावेळी जिल्हा सरचिटणीस मनोज पाटील, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा सुलोचना वाघ, जिल्हा सरचिटणीस संदीप घोरपडे, जिल्हा एनएसयूआय अध्यक्ष अॅड. कौस्तुभ पाटील, अॅड. रज्जाक शेख, सेवादल तालुका अध्यक्ष बन्सीलाल भागवत, एससी-एसटी तालुका अध्यक्ष भगवान संदानशिव, विधानसभा अध्यक्ष हर्षल जाधव, तालुका उपाध्यक्ष पी. वाय. पाटील, रामकृष्ण पाटील, डॉ. सेल अध्यक्ष डॉ. रवींद्र पाटील, दिलीप पाटील, सुधाकर भैसे, मगन पाटील, कैलास पाटील, अल्पसंख्याक सेल अध्यक्ष राजू भाट, डॉ. प्रकाश पाटील, शालिग्राम पाटील, पितांबर पाटील, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष तुषार संदानशिव, संदीप बारी, उमेश संदानशिव यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून शासनाने कर्जमाफी योजनेतील अटी शिथिल कराव्यात आणि अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळेल असा निर्णय घ्यावा, अशी मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.









