जळगाव ( प्रतिनिधी ) :- विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये युतीधर्म पाळून भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, मात्र नाशिकमध्ये शिवसेनेसोबत घात करण्यात आल्याची भावना शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. नाशिकमधील निकालानंतर जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून भाजपवर विश्वासघाताचा आरोप करण्यात येत आहे.

शिवसेना (शिंदे गट)चे प्रमुख विष्णू भंगाळे, महिला जिल्हाप्रमुख सरिता माळी-कोल्हे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी नाशिकमधील पराभवाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच आमदार किशोर पाटील यांनीही सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित करून आपली भूमिका मांडत नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे.
जळगाव विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न झाले होते. मात्र जागा भाजपच्या वाट्याला गेल्यानंतर पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या उमेदवार रेश्मा काळे यांनी माघार घेतली होती. त्याचप्रमाणे नाशिकमध्येही गोकुळ गिते यांनी उमेदवारी मागे घेतली होती.
शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मते, जळगावमध्ये शिवसेनेने महायुतीचा धर्म पाळत भाजपच्या विजयासाठी एकदिलाने काम केले. मात्र नाशिकमध्ये शिवसेनेला अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने उमेदवाराचा पराभव झाला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढली असून या घडामोडींचे आगामी राजकीय परिणाम काय होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.








