जळगाव (प्रतिनिधी) :- येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये मुस्कान चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्या सहकार्याने शनिवार दि. २८ ऑक्टोबर रोजी बाल अस्थिरोग व सेरेब्रल पाल्सीबाबत मोफत शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये लहान मुलांमध्ये असलेले हाडांच्या संदर्भातील आजार याबाबत पूर्व तपासणी करण्यात येणार आहे. तरी तपासणीसाठी रुग्णांनी यावे, असे आवाहन रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे.
मुंबई येथील प्रसिद्ध बाल अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. तरल नागडा व त्यांचे सहकारी डॉ. जयदीप धमेले हे जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दि. २८ ऑक्टोबर रोजी उपस्थिती देणार आहेत. सकाळी ९ ते दुपारी २ या ओपीडी काळामध्ये हातपाय वाकडे असणे, बोटांची रचना व्यवस्थित नसणे, हाडांसंदर्भात व्यंग असणे याबाबतच्या विविध समस्यांविषयी पूर्व तपासणी करण्यात येणार आहे.
ज्या बालकांना शस्त्रक्रियेची गरज भासणार आहे, त्यांच्यावर देखील शस्त्रक्रिया करण्यासंदर्भात कार्यवाही केली जाणार आहे. याकरिता बाल रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी शनिवारी २८ ऑक्टोबर रोजी शहरातील पांडे चौकातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपस्थिती द्यावी असे आवाहन अस्थिव्यंगोपचार विभागाचे प्रमुख डॉ. जोतीकुमार बागुल यांनी केले आहे.