मुद्देमालासह संशयिताला अटक
जळगाव (प्रतिनिधी) :- भुसावळ शहरातील पांडुरंग सिनेमाच्या मागील भागात एका तरुणाला बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली. त्याच्याकडून दोन गावठी बनावटीचे कट्टे, १ जिवंत काडतूस, महागडी दुचाकी व मोबाईल हस्तगत केला आहे.
भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजानन पडघन यांना गोपनीय माहिती मिळाली होती. भुसावळ शहरातील पांडुरंग टॉकीजच्या मागील दगडी पुलाजवळ एक इसम महागडी दुचाकी घेऊन त्याच्या कब्जात गावठी पिस्टल बाळगुन कोणता तरी गंभीर स्वरुपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरताना दिसल्याने पोलीस पथकाने संशयिताला ताब्यात घेतले. या संशयित आरोपीचे नाव देवानंद विकास कोळी ९वय-२० वर्ष रा.तुकाराम नगर, पाडळसा ता.यावल) असे आहे. पथकाने संशयिताची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेस आणि जवळ दोन गावठी बनावटीचे कट्टे व एक जिवंत काडतूस मिळून आला.
याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन पडघन, उपनिरीक्षक राजु सांगळे, पोलीस नाईक निलेश चौधरी, प्रशांत परदेशी, प्रशांत सोनार यांनी केली आहे.