जळगाव जिल्ह्यात पोलिसांची मोठी ‘नाकाबंदी मोहीम’
जळगाव (प्रतिनिधी) :- जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि रस्ते सुरक्षा नियमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे २४ एप्रिल रोजी संपूर्ण जिल्ह्यात ‘विशेष नाकाबंदी मोहीम’ राबविण्यात आली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, यामध्ये सुमारे २१०० हून अधिक वाहनांची तपासणी करण्यात आली आहे.

साडेचार तास कडक तपासणी
ही विशेष मोहीम शुक्रवारी सायंकाळी ६ ते रात्री ११ या वेळेत राबविण्यात आली. जिल्हयातील सर्व महत्त्वाच्या ५९ नाकाबंदी पॉइंट्सवर पोलिसांनी कडक तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेसाठी ४८ पोलीस अधिकारी आणि २१६ पोलीस अंमलदारांचे मोठे मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते.
नाकाबंदी दरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे:
तपासणी: सुमारे २१०० ते २२०० वाहनांची कसून तपासणी करण्यात आली.
दंड: मोटार वाहन कायद्यांतर्गत ३७४ केसेस नोंदवण्यात आल्या असून, एकूण २,३८,६५०/- रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
ड्रंक अँड ड्राईव्ह: मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या ५ चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
प्रतिबंधात्मक कारवाई: सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणाऱ्या ४६ टवाळखोरांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
मद्यप्राशन: उघड्यावर मद्यप्राशन करणाऱ्या १३ व्यक्तींवर एकूण १५ केसेस करण्यात आल्या आहेत.
प्रमुख शहरांवर लक्ष
जळगाव शहर (एमआयडीसी, शनिपेठ, जिल्हापेठ, रामानंद नगर), भुसावळ, रावेर, चोपडा, चाळीसगाव आणि पाचोरा या विभागांमध्ये ही मोठी कारवाई करण्यात आली.
गुन्हेगारी प्रवृत्तीवर वचक बसवण्यासाठी अशा मोहिमा उपयुक्त ठरत असून, नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे आणि वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.









