सायगाव येथील घटना; मेहुणबारे पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
जळगाव (प्रतिनिधी):- चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथे विहिरीत बुडाल्याने १४ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


मृत मुलीचे नाव अंजली बारकू सोडसे (वय १४, रा. नवेगाव, सायगाव ता. चाळीसगाव, जि. जळगाव) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. १०) सायंकाळी सुमारे ५.१० वाजेपूर्वी अंजली ही सायगाव गावातील विहिरीजवळ गेली असता तिचा पाय घसरून ती पाण्यात पडली. यात बुडाल्याने तिचा मृत्यू झाला.
घटनेनंतर नातेवाईकांनी तिला तत्काळ ग्रामीण रुग्णालय, मेहुणबारे येथे दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मेहुणबारे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड करीत आहेत.









