अहमदनगर एलसीबीला जामनेर पोलिसांचे सहकार्य
जळगाव (प्रतिनिधी) :- अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील शहर पोलीस ठाण्याच्या कारागृहातून चार बंद्यांनी कोठडीचे गज कापून सिनेस्टाईल पलायन केले होते. हि घटना बुधवारी ८ रोजी पहाटे पाच वाजता उघडकीस आली होती. अहमदनगर एलसीबीचे पथकाला या कैद्यांची कार जामनेर येथे खराब झाल्याचे कळले. त्यांनी जामनेर तालुक्यातील शेळगाव येथे या कैद्यांना शिताफीने ताब्यात घेतले आहे.
राहुल देविदास काळे, रमेश थापा, अनिल छबू ढोले आणि मच्छिंद्र मनाजी जाधव असे चौघे बंदीची नावे होती. या चार आरोपींनी एकाच वेळी पळ काढल्यामुळे त्यांना पकडण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली होती. यातील एका पथकाला फरार कैद्यांची कार जामनेर जवळ खराब झाल्याचे कळाले. पथकाने तात्काळ जामनेर जवळ दुपारी पोहचत त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. यावेळी जामनेर पोलिसांनी अहमदनगर एलसीबीच्या पथकाला सहकार्य केले.
याबाबत जामनेर पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी सांगितले की, शेळगाव शिवारात फरार झालेल्या बंद्यांची माहिती नगर एलसीबीला मिळाली. त्यानुसार त्यांना तपासाकामी व संशयितांना अटक करण्यासाठी जामनेर पोलिसांच्या वतीने सहकार्य करण्यात आले, असे शिंदे यांनी सांगितले.