जळगावातील पिंप्राळा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील आनंद मंगल सोसायटी पिंप्राळा परिसरात राहणाऱ्या तरुणाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी २४ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अभिषेक सुभाष राठोड (वय-२२) रा. आनंद मंगल सोसायटी, पिंप्राळा असे मयत तरूणाचे नाव आहे.
जळगाव शहरातील पिंप्राळा भागात अभिषेक राठोड हा तरूण आई – वडील आणि मोठा भाऊ यांच्यासोबत राहायला होता. तो मुंबईतील एका लॉ महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिकत होता. दुचाकी अपघात झाल्याने गेल्या दीड महिन्यांपासून तो जळगावात राहत होता. मंगळवारी २४ ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अभिषेक याने आशाबाबा नगर येथे धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही.
घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्याच्या जवळील मोबाईलच्या आधारे ओळख पटली. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्राथमिक तपास पोहेकॉ जितेंद्र तावडे करीत आहे. मयताच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे.