सोन्याचे दागिने व ५० हजारांची रोकड चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध रावेर पोलिसांत गुन्हा दाखल
रावेर (प्रतिनिधी) : रावेर शहरातील जुन्या नगरपालिका रोड परिसरात बंद घराचे दरवाजाचे बिजागर तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातील सुमारे ३ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि ५० हजार रुपये रोख, असा एकूण ३ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मधुसूदन मेडिकलसमोर, जुना नगरपालिका रोड, रावेर येथे कल्पना सुभाष वाणी (वय ६२) या अंगणवाडी सेविका राहतात. दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ७.३० ते दुपारी २ वाजेच्या दरम्यान त्या घराबाहेर असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराला लक्ष्य केले.
चोरट्याने घराच्या मागील दरवाजाचे बिजागर तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
चोरीस गेलेल्या ऐवजात दोन तोळे वजनाचे सोन्याचे लॉकेट, दोन सोन्याच्या अंगठ्या आणि ५० हजार रुपये रोख, असा एकूण सुमारे ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल असल्याचे पोलिस नोंदीनुसार समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर रावेर पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०५ व ३३१(३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास सपोनि हरीदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.









