रावेर (प्रतिनिधी): – रावेर शहरातील श्रीराम पेट्रोल पंपाच्या प्रवेशद्वाराजवळ रविवारी (५ जुलै) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात ७५ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. भरधाव व निष्काळजीपणे ट्रक चालविल्याने हा अपघात घडल्याचा आरोप असून, ट्रक चालकाविरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील कटनी जिल्ह्यातील उमरीबा येथील रहिवासी पितांबर छोटेलाल उर्फ बाबू शाह (वय ७५) हे सध्या रावेर येथील भाऊ हॉटेलजवळ वास्तव्यास होते. रविवारी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास ते श्रीराम पेट्रोल पंपाच्या प्रवेशद्वाराजवळ असताना हिमाचल प्रदेश नोंदणीचा एचपी-१९-जी-०६५५ क्रमांकाचा टाटा ट्रक त्यांच्या अंगावर आल्याने गंभीर अपघात झाला.
या अपघातात पितांबर शाह यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. ट्रक चालक संजीव कुमार रतनचंद (रा. चंबा, हिमाचल प्रदेश) याने वाहन निष्काळजीपणे चालविल्यामुळे हा अपघात घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी मृताच्या नातेवाईक अन्वर शाह यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार हमीद तडवी करीत आहे.









