रामानंद नगर पोलिसांची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी): – जळगाव शहरातील एम. जे. कॉलेज परिसरातील ९० फूट रोडवरील इन्फिनिटी कॅफेवर रामानंद नगर पोलिसांनी छापा टाकून परवान्याशिवाय सुरू असलेल्या कॅफेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कॉफी शॉपच्या नावाखाली संशयास्पद पद्धतीने बंदिस्त कॅबिन उपलब्ध करून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (५ जुलै) मध्यरात्री सुमारे १२.५० वाजण्याच्या सुमारास इन्फिनिटी कॅफेमध्ये तपासणी करण्यात आली. यावेळी संबंधित ठिकाणी कॉफी शॉप चालविण्याचा आवश्यक परवाना नसल्याचे आढळून आले. तसेच प्रत्यक्षात कॉफी किंवा इतर खाद्यपदार्थांची विक्री न करता, आतमध्ये लाकडी कंपार्टमेंट तयार करून त्यामध्ये सोफ्यांची व्यवस्था करण्यात आली होती.
या बंदिस्त जागांचा वापर तरुण-तरुणींना बसण्यासाठी तसेच अश्लील कृत्यांसाठी जागा उपलब्ध करून दिल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
या प्रकरणी कॅफे चालक धीरज भगवानसिंग बागुल (वय २८, रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम १२९ व १३१(अ)(क) अन्वये रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे करीत आहे.









