सोन्याचे टॉप्स, बांगड्या, रोकड व एम.व्ही.आर. चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव ( प्रतिनिधी ) – रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रायसोनीनगर परिसरात घरफोडीची घटना घडली. अज्ञात चोरट्याने घरातील लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने, रोकड व एम.व्ही.आर. असा एकूण ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे समोर आले आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयश्री संजय पाटील (वय ५५, व्यवसाय-व्यापार, रा. ४५९/२, रायसोनीनगर, जळगाव) यांच्या राहत्या घरात २० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपासून २१ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने प्रवेश केला.
चोरट्याने बेडरूममधील लोखंडी कपाटातील सामानाची चोरी केली. यात २० हजार रुपये किमतीचे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे टॉप्स, १५ हजार रुपये किमतीच्या दीड तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या, ५१ हजार रुपये रोख रक्कम आणि ३ हजार रुपये किमतीचा एम.व्ही.आर. असा एकूण ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला.
या प्रकरणी फिर्यादी जयश्री पाटील यांच्या तक्रारीवरून २३ सप्टेंबर २०२६ रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २६९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. परिसरातील माहिती व उपलब्ध पुराव्यांच्या आधारे अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या गुन्ह्याचा तपास पोहेकॉ./७०९ मनोज सुरवाडे करीत आहेत.आरोपी अद्याप अटक झालेला नाही.









