रावेर तालुक्यातील धक्कादायक घटना
रावेर (प्रतिनिधी) – : रावेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोधा येथे पैशांच्या कारणावरून एका ७२ वर्षीय महिलेचा तिच्याच घरात काम करणाऱ्या सालदाराने कंबरेच्या पट्ट्याने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी घडली. ललिताबाई वसंत पाटील (वय ७२, रा. दोधा, ता. रावेर) असे मयत महिलेचे नाव असून, या प्रकरणी लाला धर्मा भिलाला (वय १९, मूळ रा. नशिराबाद बोरी, ता. नेपानगर, जि. बुऱ्हाणपूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी लाला भिलाला हा पाटील यांच्या घरी सालदार म्हणून काम करीत होता. आरोपीच्या पत्नीने त्याच्याकडे संसारासाठी ३० हजार रुपयांची मागणी केल्याचे सांगण्यात येत असून, पैसे न दिल्यास दुसरे लग्न करण्याची धमकी ती देत असल्याचेही समोर आले आहे. या आर्थिक तणावातून आरोपीने पैशांची गरज असल्याने हा प्रकार केल्याचा प्राथमिक संशय आहे.
गुरुवारी दुपारी सुमारे १.३० वाजेच्या सुमारास आरोपी घराच्या मागील बाजूने घरात शिरला. त्यानंतर त्याने स्वतःच्या कंबरेच्या बेल्टच्या साहाय्याने ललिताबाई यांचा गळा आवळून खून केल्याचे पोलिस तपासात समोर आल्याचे सांगण्यात आले.
त्यानंतर मयत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे हार व कानातील दागिने काढून आरोपी तेथून निघून गेला. विशेष म्हणजे, त्यानंतर काहीच घडले नसल्याप्रमाणे तो वावरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
घटनेची माहिती मिळताच रावेर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपीचा शोध घेतला. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. तसेच त्याने लपवून ठेवलेले मयताचे दोन गळ्यातील हार आणि कानातील दागिने पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास रावेर पोलीस करीत आहेत.








