भरत पाटील लिखित “फुलताना” पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात
जळगाव (प्रतिनिधी) :- प्रयोगशील शिक्षक हे देशाची संपत्ती आहे असे मत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांनी मांडले. प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत “फुलताना” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला.
या प्रसंगी नोबेल फाऊंडेशनचे संचालक जयदीप पाटील आणि राजेंद्र पाटील यांची उपस्थिती होती. प्रकाशन प्रसंगी कुलगुरूंनी “फुलताना” या पुस्तकाचे मन:पूर्वक कौतुक करताना सांगितले की, “शिक्षकांनी अनुभव लेखनातून शिक्षणक्षेत्रात नवे दालन उघडावे. नव्या प्रयोगशील वृत्तीचे सदैव स्वागत आहे. ‘फुलताना’ हे पुस्तक केवळ शब्दांचे संकलन नसून, एका शिक्षकाच्या जिवंत अनुभवांची समृद्ध झलक आहे.” प्रा. एस. टी. इंगळे यांनीही आपल्या मनोगतातून लेखकाच्या प्रयोगशीलतेचे व भावनात्मक लिखाणाचे विशेष कौतुक केले. “फुलताना” हे पुस्तक प्राथमिक शिक्षक भरत पाटील यांनी मालेगाव तालुक्यातील प्राथमिक शाळांमध्ये राबविलेल्या उपक्रमांची तसेच विद्यार्थी व पालकांसोबत आलेल्या दैनंदिन शालेय कामकाजातील अनुभवांची मांडणी आहे..यातील लेख जीवन कौशल्ये, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० यांचा पुरस्कार करतात.