नाशिक विभागात अमळनेरचे प्रांत, भुसावळचे डीवायएसपी, वरणगावचे वैद्यकीय अधीक्षक ठरले नंबर वन
केसरीराज विशेष प्रतिनिधी
जळगाव :- जिल्ह्यातील विविध सरकारी विभागांनी मुख्यमंत्री १०० दिवसांच्या उपक्रमात मोठे यश मिळविले आहे. जिल्ह्यातील १८ विभागांनी आपली छाप सोडली असून अनेकांनी नाशिक विभागात प्रथम क्रमांक मिळविला आहे. यामुळे जिल्ह्यातील शासकीय अधिकाऱ्यांना चांगले काम करण्यास बळ मिळणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या उपक्रमात अमळनेर उपविभागीय कार्यालयाने नाशिक विभागात प्रथम क्रमांक मिळवला आहे. भौतिक सुविधांसह जनतेला तत्पर सेवा, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा, कार्यालयातील सुविधा, जनतेप्रति कर्मचाऱ्यांची वागणूक असे काही निकष देण्यात आलेले होते. (केएसएन)यात उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी पिण्याचे शुद्ध पाणी, रेकॉर्ड रूम अद्ययावत करून त्याचे संगणकीकरण करणे, जेष्ठ नागरिकांची प्रकरणाचा तात्काळ निपटारा केल्याने आणि जनहिताच्या निर्णय घेतल्याने अमळनेर उपविभाग नाशिक विभागात प्रथम आला आहे. उपविभागीय कार्यालय नाशिक विभागात प्रथम आल्याने प्रांत नितीनकुमार मुंडावरे यांच्यासह कर्मचाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
नाशिक विभागात उपविभागीय पोलीस अधिकारी संवर्गात भुसावळ पोलीस उपअधीक्षक कार्यालय प्रथम आले आहे. डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांनी ‘सुपर कॉप ऑफ द मंथ’ पुरस्कार सुरु करून कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केले आहे. तर प्रशासकीय पातळीवर अद्ययावतीकरण करून सुधारणा घडवून आणली आहे. त्यामुळे भुसावळ विभागात त्यांच्या कामाची वेगळीच छाप पडली आहे. फैजपूर येथील डीवायएसपी कार्यालयाचा प्रभारदेखील भुसावळ डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांच्याकडे आहे.
वैद्यकीय अधीक्षक संवर्गात नाशिक विभागात वरणगाव रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक हे सर्वोत्तम ठरले आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन अहिरे यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने अभ्यागतांसाठी सुसज्ज प्रतिक्षालय व्यवस्था, स्वच्छता, जुन्या व निरुपयोगी जड वस्तूंची विल्हेवाट लावणे, मुदतबाह्य अभिलेखे नष्ट करणे, तक्रार निवारण करणे, कार्यालयीन सोईसुविधा वरणगाव रुग्णालयात करण्यात आल्या आहेत.(केएसएन)कार्यालयाचे सौंदर्यीकरणासाठी रंगरंगोटी करण्यात आलेली आहे. वेळोवेळी क्षेत्रीय कार्यालयांना भेटी देण्यात आल्या आहेत. आठवड्यातून किमान २ दिवस क्षेत्रीय कार्यालयांना भेटी देऊन पाहणी केली. प्रशासकीय कामकाजात १ जानेवारी २०२५ पासून ई-ऑफिस प्रणालीचा वापर सुरु केला आहे. अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण, सेवा विषयक बाबी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे वरणगाव रुग्णालयाचा कायापालट होत आहे.
याशिवाय तहसीलदार संवर्गात जामनेर येथील नानासाहेब आगळे हे प्रथम, उपअधीक्षक, भूमी अभिलेखमध्येही जामनेरला प्रथम क्रमांक आहे. दुय्यम निबंधक संवर्गात जळगावला तृतीय क्रमांक, तालुका वैद्यकीय अधिकारी संवर्गात रावेरला तृतीय, तालुका कृषी अधिकारी संवर्गात चाळीसगावला प्रथम, पोलीस निरीक्षक संवर्गात एमआयडीसीचे निरीक्षक संदीप पाटील प्रथम, सहायक वन संरक्षक संवर्गात यावल प्रथम तर जळगाव द्वितीय आले आहे.(केएसएन)वनपरिक्षेत्र संवर्गात जळगाव द्वितीय, उपअभियंता (मजीप्रा) संवर्गात भुसावळचा तृतीय क्रमांक, उपअभियंता (ग्रापापु) संवर्गात जळगाव प्रथम आले. सहायक पशुसंवर्धन आयुक्त तालुका लघुपशू चिकित्सालय संवर्गात धरणगावला द्वितीय क्रमांक, पशुधन विकास अधिकारी संवर्गात विवरा ता. रावेर द्वितीय, मुख्याधिकारी संवर्गात धरणगावचे मुख्याधिकारी प्रथम आले आहे.
सहायक निबंधक (सहकारी संस्था) संवर्गात आणि उप कोषागार अधिकारी संवर्गात धरणगाव द्वितीय, गटशिक्षण अधिकारी संवर्गात भुसावळ तृतीय आले आहे. अशी एकूण १८ विभागांची कामगिरी सर्वोत्कृष्ट ठरली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सरकारी अधिकाऱ्यांना चांगले काम करण्यासाठी अधिक बळ मिळणार असून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सर्वोत्तम ठरलेल्या विभागांचे अभिनंदन केले आहे.