जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

जळगाव (प्रतिनिधी) : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियान २०२६ अंतर्गत जळगाव शहर महानगरपालिकेच्या दवाखाना विभागातर्फे रविवारी (२८ जून) शहरात पल्स पोलिओ मोहिमेचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. धन्वंतरी देवतेचे पूजन करून मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी आमदार राजूमामा भोळे आणि महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते लहान बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजून मोहिमेची सुरुवात करण्यात आली.
यावेळी बोलताना आमदार राजूमामा भोळे यांनी बाळ आणि बाळंत माता यांच्या आरोग्यासाठी डॉक्टरांनी विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगितले. निरोगी बालक हे सुदृढ समाजाचे भविष्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.
महापौर दीपमाला काळे यांनी जळगाव शहरातील शून्य ते पाच वर्षे वयोगटातील सर्व बालकांच्या पालकांना आपल्या मुलांना पोलिओचा डोस देण्याचे आवाहन केले. पोलिओसारख्या संभाव्य अपंगत्वापासून मुलांचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक बालकाचे लसीकरण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
महापौरांनी माहिती दिली की, ३० जूनपासून शहरात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन पोलिओ लसीकरण करण्यात येणार आहे. या मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमास उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती सिंधुताई कोल्हे, आरोग्य विभागाचे उपसंचालक दिलीप सौंदळे, नगरसेवक दीपक सूर्यवंशी तसेच राष्ट्रीय हिवताप अभियानाचे अधिकारी के. बी. नगराळे, प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ, डॉ. राम रावलानी, डॉ. स्वप्नील सोनवणे, इन्चार्ज परिचारिका प्रिया सूर्यवंशी आणि महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.









