यावल (प्रतिनिधी) :- यावल तालुक्यातील कोळवद शिवारात सोमवारी रात्री उसाच्या पिकाला लागलेल्या भीषण आगीने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. शेत गट क्रमांक ५६६ मधील तब्बल सात बिघे क्षेत्रातील उभा ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला असून, या दुर्घटनेत शेतकरी चंद्रकांत इच्छाराम राणे (रा. बामणोद, ता. यावल) यांचे सुमारे १६ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.चंद्रकांत राणे यांचे कोळवद शिवारात गट क्रमांक ५६६ मध्ये शेत असून, त्यांनी सात बिघे क्षेत्रात उसाची लागवड केली होती. ऊस चांगल्या प्रकारे वाढलेला असतानाच सोमवारी रात्री अचानक पिकाला आग लागली. सुरुवातीला लागलेली आग काही वेळातच भडकली आणि पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण शेताला वेढा घातल्याने उभ्या उसाचे पीक काही वेळातच जळून खाक झाले.घटनेची माहिती मिळताच आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचा बंब बोलावण्यात आला. मात्र, आगीची तीव्रता प्रचंड असल्याने अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत संपूर्ण ऊस जळून खाक झाला होता. वर्षभराच्या मेहनतीने उभे केलेले पीक डोळ्यादेखत जळून गेल्याने शेतकरी राणे यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.या घटनेप्रकरणी चंद्रकांत राणे यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात आग लागल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमित तडवी करीत आहेत.










