एसीबीने सील केलेल्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

लाचखोरी प्रकरणातील अधिकाऱ्याच्या जळगावातील निवासस्थानी घडला प्रकार
जळगाव (प्रतिनिधी) : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जळगावातील सील केलेल्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन जणांना जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होता का, याचा तपास पोलीस करीत आहेत.
अकोला येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी (अकोला वर्ग-१) किरण पुरुषोत्तम चौधरी यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई केली होती. या प्रकरणाच्या अनुषंगाने त्यांचे जळगाव शहरातील गणेश कॉलनी परिसरातील साईप्रभा आर्केडमधील निवासस्थान घरझडतीसाठी लाचलुचपत विभाग, जळगाव यांनी सील करून सुरक्षित ठेवले होते.
दरम्यान, रविवारी पहाटे सील केलेल्या घरातून काही आवाज येत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असता, घराच्या मागील बाजूने शिडी लावून आत प्रवेश केलेल्या दोन जणांना जागीच पकडण्यात आले.
या प्रकरणी पोलीस निरीक्षक स्मिता वसंत नवघरे यांच्या फिर्यादीवरून प्रसाद वसंत नारखेडे (वय ३३, रा. डांभुर्णी, ता. यावल) ,प्रवीण अशोक महाजन (वय ३६, रा. गणेश कॉलनी, जळगाव) यांच्यावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २०७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ), ३३१(२), २३८ आणि ६२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेनंतर काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले आहेत. सील केलेल्या घरात प्रवेश करण्यामागे नेमका उद्देश काय होता? घरातील मौल्यवान वस्तू किंवा आर्थिक व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे हटविण्याचा प्रयत्न करण्यात आला का? तसेच या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलीस करीत आहेत.जिल्हापेठ पोलीस पुढील तपास करीत असून, या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









