‘मुख्यमंत्री १०० दिवस कार्यक्रम’ योजनेचा निकाल जाहीर
(केसरीराज विशेष प्रतिनिधी)
जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या कृती कार्यक्रम योजनेचा निकाल जाहीर झाला आहे. नाशिक विभागामध्ये पोलीस निरीक्षक संवर्गामध्ये सर्वोत्तम पहिला नंबर जळगावच्या एमआयडीसी पोलीस ठाणे यांनी पटकावला आहे. त्यामुळे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
१०० दिवस सुधारणा कार्यक्रमांतर्गत करावयाच्या कामांबाबत पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी सातत्याने मार्गदर्शन करून आढावा घेत पोलीस दलाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध कार्यालयांना, पोलीस ठाण्यांना सुधारणा कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने कार्यालयीन सुधारणा, स्वच्छता, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून आवश्यक त्या सुविधा व उपाययोजना करणेबाबत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल उपविभाग स्तरावर एमआयडीसी पोलीस स्टेशन सर्वोत्तम ठरले आहे. दुसरा क्रमांक अहिल्यानगर जिल्ह्यातील कोतवाली पोलीस स्टेशनचा तर तृतीय क्रमांक धुळे जिल्ह्यातील पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनचा आला आहे.
एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक संदीप पाटील यांनी “केसरीराज”शी बोलताना सांगितले की, लोकांना पासपोर्टची सेवा शंभर टक्के वेळेत पुरवणे, चारित्र्य पडताळणी सेवा १००% वेळेत देणे यासह स्वच्छता उपक्रम, जुने मुद्देमाल निर्गती करणे, रेकॉर्ड अद्ययावत करून जुना रेकॉर्ड नष्ट करणे यासह कर्मचारी व अधिकाऱ्यांचे वेळोवेळी प्रशिक्षण घेऊन त्यांना प्रशिक्षित करणे हे काम आम्ही या १०० दिवसाच्या आत यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवले. यासोबतच “एक सत्र विद्यार्थ्यांसाठी”, पोलिस स्टेशन मधील सर्वोत्कृष्ट अंमलदार हा पुरस्कार देऊन गौरव करणे तसेच सामाजिक ऐक्य जोपासताना एकता होळी हा उपक्रम आम्ही राबवला.
वेळोवेळी स्वच्छतेला महत्त्व देऊन पोलीस स्टेशन स्वच्छ व सुंदर राहील याकडे लक्ष दिले. या सर्व मुद्द्यांवर तसेच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकाऱ्यांच्या सोबतीने एमआयडीसी पोलीस स्टेशनची सातत्याने प्रगती करीत राहिलो म्हणून आज आम्हाला हा सन्मान मिळत आहे, असेही पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी “केसरीराज” शी बोलताना सांगितले.