एरंडोल तालुक्यातील खर्ची-सुकेश्वर येथील घटना, कामतवाडीला शोककळा
एरंडोल (प्रतिनिधी) : तालुक्यात खर्ची सुकेश्वर परिसरात गिरणा नदीमध्ये मासे पकडून पायी घरी जात असलेल्या तरुणाचा अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दि. १६ रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.
शरद रामा भिल (वय ४०, रा.कामतवाडी ता. धरणगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तो परिवारासह गावात राहत होता. त्यांचे सासरे लक्ष्मण श्रावण ठाकरे यांच्याकडे ते शुक्रवारी खर्ची गावात आले होते.(केसीएन) शुक्रवारी दुपारी गिरणा नदीच्या पात्रात मासे पकडण्यासाठी शरद भिल्ल हे सुकेश्वर शिवारात गेले होते. त्यांच्या सासरे गावाला लागून असलेल्या एका शेतात थांबलेले होते. मासे पकडून सासऱ्यांसोबत शरद बिल हे घरी जाणार होते. दरम्यान मासे पकडून घरी पायी जात असताना त्यांच्यावर विज पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ग्रामस्थांना खबर कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांचा मृतदेह एरंडोल ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. मात्र तेथे वैद्यकीय पथकाने तपासून शरद भील यांना मयत घोषित केले. शरद भील यांच्या छातीवर, कानावर जखमा आहेत. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. घटनास्थळी एरंडोल पोलिस स्टेशनचे एएसआय राजेश पाटील, हेड कॉन्स्टेबल महेंद्रसिगं पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.(केसीएन)पुढील कार्यवाही एरंडोल पोलीस स्टेशनचे निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे या घटनेमुळे कामतवाडी गावावर शोककळा पसरली आहे. खर्ची गावात मात्र या घटनेमुळे खळबळ उडाली. एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.