चोरीचा मुद्देमाल हस्तगत
जळगाव (प्रतिनिधी): पिंप्राळा परिसरातील सोमानी मार्केटमधील पान मसाल्याचे दुकान फोडून सिगारेटचे बॉक्स व रोख रक्कम असा एकूण ३७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरणाऱ्या दोन आरोपींना रामानंद नगर पोलिसांनी अटक करून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ जुलै २०२६ रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून विविध कंपन्यांच्या सिगारेटचे २० बॉक्स आणि ५ हजार रुपये रोख असा एकूण ३७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी फिर्यादी सुरेश नवले यांच्या तक्रारीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस कर्मचारी सुधाकर अंभोरे व सुशील चौधरी यांनी गोपनीय माहिती तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांची ओळख पटवली. त्यानुसार पोलिसांनी सिद्धार्थ विनोद आटाळे (वय १९) आणि दिपक भगवान सोनवणे (वय २०, दोघेही रा. पिंप्राळा हुदको, जळगाव) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिल्यानंतर दोघांना २२ जुलै २०२६ रोजी अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून फिर्यादीचा चोरीस गेलेला मुद्देमालही जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली रामानंद नगर पोलीस पथकाने केली. गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.








