फैजपूर (प्रतिनिधी): येथील इंदिरा नगर, भालोद (ता. यावल) भागात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ५५,५०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नत्थू खंडू चौधरी (वय ६७ वर्ष, व्यवसाय- आचारी काम, रा. इंदिरा नगर, भालोद) हे दि. १७ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजेच्या सुमारास घराबाहेर गेले होते. या दरम्यान, दि. २३ जुलै २०२६ रोजी दुपारी ०२:०० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप कशाच्या तरी साहाय्याने तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाट देखील तोडले आणि कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोख रोकड लंपास केली.
चोरीला गेलेला मुद्देमाल: १) सन १९८२ च्या किमतीनुसार २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोरले (किंमत १,००० रु.) २) २ ग्रॅम वजनाचे मणी मंगळसूत्र (किंमत १,००० रु.) ३) ५ ग्रॅम वजनाची बादामी आकाराची सोन्याची अंगठी (किंमत २,५०० रु.) ४) प्रत्येकी २ भार याप्रमाणे ४ भार वजनाचे चांदीचे जोडवे (किंमत १,००० रु.) ५) ५०० रुपयांच्या ८० नोटा आणि १०० रुपयांच्या १०० नोटा अशी एकूण ५०,००० रुपयांची रोख रक्कम.
असा एकूण ५५,५०० रुपयांचा मुद्देमाल घरातून चोरीला गेला आहे. या प्रकरणी फिर्यादी नत्थू चौधरी यांच्या खबरीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात CCTNS गु.र.नं. १५८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(A), ३३१(३), ३३१(४) अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर आणि फैजपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि संदीप पाटील यांनी दि. २३ जुलै रोजी संध्याकाळी ५:०० ते रात्री ९:३० वाजेच्या दरम्यान घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार (ब.नं. ८५४) संजय श्रीधर झालटे करत असून अद्याप कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.









