वेरूळ येथील पोल्ट्री फार्मवरील हृदयद्रावक घटना; अंगणात खेळत असताना कुत्र्यांच्या टोळीचा हल्ला
पाचोरा/खुलताबाद ( प्रतिनिधी ) – वेरूळ शिवारातील एका खासगी पोल्ट्री फार्मवर भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तीन वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी (२२ जुलै) दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सार्थक (उत्कर्ष) गजानन पाटील (मूळ रा. सातगाव डोंगरी, ता. पाचोरा) हा आपल्या आई-वडिलांसोबत गेल्या चार महिन्यांपासून वेरूळ शिवारातील गट क्रमांक ३१० मधील एका खासगी पोल्ट्री फार्मवर वास्तव्यास होता. बुधवारी दुपारी वडील कोंबड्यांना खाद्य देत होते, तर आई घरकामात व्यस्त होती. त्याचवेळी सार्थक अंगणात एकटाच खेळत असताना भटक्या कुत्र्यांच्या टोळीने त्याच्यावर अचानक हल्ला केला.
हल्ल्यानंतर कुत्र्यांनी चिमुकल्याला फरफटत काही अंतरावर नेले. आरडाओरडा ऐकून वडिलांनी धाव घेत कुत्र्यांना पिटाळून लावले. मात्र, तोपर्यंत सार्थकच्या डोक्यासह पाय, पाठ, कंबर, पोट आणि शरीराच्या इतर भागांवर गंभीर जखमा झाल्या होत्या. या गंभीर जखमांमुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच खुलताबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी वेरूळ प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.









