अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांची संयुक्त कारवाई; २,२३४ रुपयांचा मुद्देमाल जप्त
जळगाव, (प्रतिनिधी) : पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेवडगाव येथे प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा करून विक्रीसाठी ठेवणाऱ्या एका व्यक्तीवर अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाईत २,२३४ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी आंबेवडगाव येथील आरोपीच्या राहत्या घरावर छापा टाकण्यात आला. यावेळी घरातून विविध ब्रँडचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात विमल पान मसाल्याची ७ पाकिटे तसेच व्ही-१ सुगंधित तंबाखूची ७ पाकिटे असा एकूण १४ पाकिटांचा समावेश असून त्यांची एकूण किंमत २,२३४ रुपये आहे.
या प्रकरणी भैय्या अशोक मराठे (वय ३२, रा. आंबेवडगाव, ता. पाचोरा) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील संबंधित कलमान्वये पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी किशोर हिमतराव बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली. पुढील तपास पोलीस हवालदार तात्याबा नागरे करीत आहेत.









