१६ गुन्हे केलेल्या, ५ वर्षांपासून फरार ठाण्यातील संशयित अटकेत
जळगाव (प्रतिनिधी) :- ठाणे, पालघर येथे दरोडे टाकून तब्बल १६ गुन्हे केलेल्या व ५ वर्षांपासून पोलिसांना चकमा देणाऱ्या संशयित गुन्हेगाराला सिंधी कॉलनी येथील वर्सी महोत्सवातून ठाणे व जळगावच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला नोंद घेण्यात आली आहे.
प्रथमेश उर्फ डॉन प्रकाश ठमके (२४, रा. उल्हासनगर, जि. ठाणे) असे संशयित गुन्हेगाराचे नाव आहे. प्रथमेश ठमके हा ठाणे व पालघर परिसरात मोठमोठे दरोडे टाकून फरार व्हायचा. गेल्या पाच वर्षांपासून ठाणे, पालघर पोलिसांसह राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणचे पोलिस त्याचा शोध घेत होते. प्रथमेशचे काही नातेवाईक जळगावात राहतात. प्रथमेश त्याच्या पत्नीसाठी जळगावातील सिंधी कॉलनीत सुरू असलेल्या सिंधी बांधवांच्या वर्सी महोत्सवात आला होता. त्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाली होती. त्यांनी जळगावच्या पोलिसांची मदत घेतली.
त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, रुपाली महाजन, जिल्हा विशेष शाखेचे सहायक फौजदार दिनेश बडगुजर, पोकॉ अमित मराठे, पोलिस नाईक जुबेर तडवी हे वर्सी महोत्सवात पोहचले. त्या ठिकाणी एका खोलीतून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक रुपाली पोळ व पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.