
पाचोरा शहरातील समर्थ व्हॅली परिसरातील घटना; ६५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास
पाचोरा ( प्रतिनिधी ) :- पाचोरा शहरातील समर्थ व्हॅली परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण ६५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका सुधाकर सूर्यवंशी (वय २७, रा. समर्थ व्हॅली, पाचोरा) या आपल्या घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. दरम्यान, ६ जून रोजी दुपारी ३ वाजेपासून ७ जून रोजी पहाटे ५ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
चोरट्याने घरातील ३० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत, १५ हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या तसेच २० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. घरफोडीचा प्रकार लक्षात आल्यानंतर प्रियंका सूर्यवंशी यांनी पाचोरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ) व ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ. वसीम सलीम शेख करीत आहेत.









