सायबर पोलीस स्टेशनचा यशस्वी तपास
जळगाव (प्रतिनिधी) :- विम्यावर अधिक बोनस व मेडिकल कव्हर मिळवून देण्याचे अमिष दाखवत एका तरुणाला ८ लाख ९५ हजार ६४६ रुपयांमध्ये फसवणूक केल्याप्रकरणी जळगाव सायबर पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी दिव्यांग तरुणासह त्याच्या मावसभावाला गोवा राज्यातून अटक केली आहे.
अवदेशकुमार रामकिशोर (वय २४) व रामप्रसाद लल्लू निशाद (२५, रा. उत्तर गोवा) यांना गोवा येथून अटक केली आहे. तक्रारदार पुरुषाला त्याच्या इन्शुरन्स पॉलिसीवर बोनस रक्कम मिळवून देऊ असे सांगून तसेच त्यांच्यासह त्यांच्या पत्नीला मेडिकल कव्हरचे आमिष दाखवून त्यांना बनावटीकरण केलेले बॉण्ड पेपर व इन्कम टॅक्सचे प्रमाणपत्र व्हाट्स अपद्वारे पाठविले होते. त्यांच्याकडून वेळोवेळी ८ लाख ९५ हजार ६४६ रुपये घेतले. मात्र कुठलीही रक्कम न देता आर्थिक फसवणूक केली होती. त्यानुसार डिसेंबर महिन्यात दाखल झालेल्या या गुन्ह्याचा तपास सुरू होता.
तपासात पणजी, मडगाव येथील एटीएममधून सदर खात्यावरून रक्कम काढल्याचे समजले होते. त्यामुळे संबंधित बँकेकडून तेथील सीसीटीव्ही फुटेज मागवण्यात आले. त्याआधारे सायबर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि दिगंबर थोरात, पोहेकॉ दिलीप चिंचोले, पोकॉ गौरव पाटील, दीपक सोनवणे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोकॉ ईश्वर पाटील, पोहेकॉ प्रवीण वाघ, राजेश चौधरी यांनी तपास करत या गुन्ह्याचा छडा लावला. अटक केलेल्या दोघांकडून मोबाईल, सिमकार्ड, चेकबुक, डेबिट कार्ड व इतर साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. अवदेशकुमार व रामप्रसाद याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. यातील रामप्रसाद हा दिव्यांग असूनही त्यांने मावसभाऊ अवदेशकुमार याच्यासह हा प्रताप केला आहे.