निंभोरा परिसरातून ६६ हजारांची गाय चोरीला


अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू
रावेर | प्रतिनिधी
रावेर तालुक्यातील निंभोरा बुद्रुक परिसरात गोठ्याजवळ बांधलेली सुमारे ६६ हजार रुपये किमतीची गाय अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निंभोरा बुद्रुक येथील लक्ष्मण गोविंदा बोंडे (वय ६५) हे मजुरीचे काम करतात. त्यांच्या मालकीची गाय निंभोरा परिसरातील शिवारा येथे असलेल्या गायींच्या गोठ्याजवळ बांधलेली होती.
२९ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेनंतर ते ३० जुलै रोजी सकाळी ६ वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने गाय चोरून नेली. सकाळी गाय जागेवर नसल्याचे लक्षात आल्यानंतर तिचा परिसरात शोध घेण्यात आला. मात्र गाय मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.चोरीस गेलेल्या गायीची अंदाजे किंमत ६६ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारदाराच्या फिर्यादीवरून निंभोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) नुसार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून, चोरीस गेलेली गाय आणि आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अविनाश पाटील करीत आहेत.









