
पुलावर स्कूटर, चप्पल आणि आधार कार्ड आढळले; घटनेपूर्वी नातेवाईकांना संदेश पाठविल्याची माहिती
यावल ( प्रतिनिधी ) : यावल तालुक्यातील शेळगाव बॅरेज येथे मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी सकाळी एका व्यक्तीने पाण्यात उडी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून जळगाव येथील रहिवासी राजू नेरकर यांचा शोध घेण्यासाठी यावल पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.घटनास्थळी संबंधित व्यक्तीची स्कूटर, चप्पल आणि ओळख पटविण्यासाठी आधार कार्ड आढळून आले.

या वस्तूंमुळे परिसरात नागरिकांची गर्दी जमली. घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून आढळलेल्या वस्तू ताब्यात घेतल्या. आधार कार्डच्या आधारे संबंधित व्यक्तीची ओळख पटविण्यात आली असून पाण्यात उडी घेतलेल्या व्यक्तीचे नाव राजू नेरकर असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, संबंधित व्यक्तीने घटनेपूर्वी आपल्या नातेवाईकांना आत्महत्येबाबत संदेश पाठविल्याची माहितीही समोर आली आहे. मात्र, त्यांनी हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणामुळे उचलले, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.शेळगाव बॅरेजमधील पाण्याची खोली आणि प्रवाह लक्षात घेता शोधकार्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून संबंधित व्यक्तीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू असून पुढील तपास यावल पोलीस करीत आहेत.या घटनेमुळे शेळगाव बॅरेज परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून राजू नेरकर यांचा शोध लागण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








