
ग्रामीण रुग्णालयात तपासणी व नोंदणीसाठी गर्दी; गरजू ज्येष्ठांना सहाय्यक साहित्य मिळण्याची आशा


यावल ( प्रतिनिधी ) : वयोमानानुसार उद्भवणाऱ्या शारीरिक अडचणींवर मात करून ज्येष्ठ नागरिकांचे जीवन अधिक सुलभ व्हावे, या उद्देशाने यावल येथील ग्रामीण रुग्णालयात बुधवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत विशेष तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराला ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून तपासणी व नोंदणी प्रक्रियेसाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली.केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार यांच्या माध्यमातून तसेच भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (ALIMCO) यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या विशेष प्रयत्नांतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.शिबिरात आलेल्या ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी करून त्यांच्या गरजेनुसार तपासणी करण्यात येत आहे.
वयोमानामुळे चालताना, ऐकताना तसेच दैनंदिन कामे करताना अडचणी येणाऱ्या नागरिकांना आवश्यक सहाय्यक उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी पात्रता निश्चित करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामध्ये व्हीलचेअर, वॉकर, श्रवणयंत्र, चालण्यासाठी काठी तसेच इतर सहाय्यक साहित्याचा समावेश आहे.विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी स्थानिक पातळीवर अशा प्रकारचे शिबिर आयोजित केल्याने त्यांना मोठा दिलासा मिळत आहे. शिबिरस्थळी ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती आणि नोंदणीसाठी सुरू असलेली लगबग यामुळे उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून आले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश परिषद सदस्य हिरालाल चौधरी, विधानसभा क्षेत्र प्रमुख विलास चौधरी, ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष हर्षल पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती उज्जैन राजपूत, माऊली फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य सविताताई भालेराव, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन नारायण बापू चौधरी, माजी चेअरमन नरेंद्र नारखेडे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, यावल तालुका भाजप अध्यक्ष सागर कोळी, तालुका सरचिटणीस भरत पाटील, नगरसेविका सविता नन्नवरे व शुभांगीताई येवले, बाजार समिती संचालक निलेश गडे, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष उज्ज्वल कानडे, नगरसेवक हेमराज फेगडे, रुबाब तडवी व योगेश चौधरी, विजय भारंबे, सतीश कोळी, किनगाव मंडळाध्यक्ष अनिल रामराव पाटील, मयूर पाटील, चंद्रशेखर चौधरी, रितेश बारी, मयूर महाजन, दिनेश पाटील, चेतन आढळकर, दिलीप वाणी व वीर येवले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.









