जळगाव (प्रतिनिधी) – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा कोविड रुग्णालयात करोनाबाधित सात वर्षीय बालकाला गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले होते. तब्बल १८ दिवस त्याच्यावर यशस्वी उपचार करून त्याला मंगळवारी अधिष्ठात्यांच्या उपस्थितीत डिस्चार्ज देण्यात आला.

येथील गुजराल पेट्रोल पंप परिसरातील सात वर्षीय बालक करोनाबाधित असल्याने २५ ऑगस्ट रोजी मनपाच्या तंत्रनिकेतन विद्यालयातील कोविड दक्षता केंद्र येथे आईसह उपचारासाठी दाखल होता. मात्र बालकाला दोन दिवसांनी खोकला, ताप तसेच श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने त्याच्यासह त्याच्या आईला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा कोविड रुग्णालयात ४ नंबरच्या वोर्डात दाखल करण्यात आले होते. त्याचा ऑक्सिजन देखील कमी जास्त होता.
त्यामुळे त्याला कोविडविषयी उपचार सुरु करण्यात आले होते. सलग ४ दिवस त्याची प्रकृती खालावत जात होती. ब्लड प्रेशर कमी, पोटात रक्तस्राव होत होता. मात्र सतत रुग्णावर निगराणी, वरिष्ठांचे लक्ष यामुळे १४ व्या दिवशी त्याची परिस्थिती नियंत्रणात आली. मंगळवारी १८ व्या दिवशी त्याची प्रकृती चांगली झाल्याने त्याला गृह विलगीकरणसाठी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. यावेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, डॉ. मधुकर गायकवाड उपस्थित होते. त्यामुळे बालकाच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त करीत वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आभार मानले.







