एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत करणार प्रवेश
जळगाव (प्रतिनिधी):- जिल्ह्यातील ठाकरे गटाचे उत्तर महाराष्ट्रातील खंबीर नेते आणि माजी खासदार उन्मेश पाटील यांनी अखेर उद्धव सेनेला निरोप देण्याचा (जय महाराष्ट्र करण्याचा) निर्णय घेतला आहे. पाटील हे आता उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (शिंदे गट) मध्ये आपल्या कार्यकर्त्यांसह अधिकृतपणे प्रवेश करणार आहेत.

येत्या शुक्रवारी ६ तारखेला मुंबई येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उन्मेश पाटील यांनी भाजप सोडून शिवसेना (उबाठा) गटात प्रवेश केला होता. मात्र, आता त्यांनी पुन्हा आपली राजकीय दिशा बदलली आहे. या निर्णयापूर्वी त्यांनी जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर दिल्लीत खा.श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्यावर त्यांच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झाले.
उन्मेश पाटील यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काम करण्याची पद्धत अत्यंत चांगली असल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.









