मुंबई (वृत्तसंस्था) – देशात कोरोनाने हातपाय पसरले आहेत. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 400 पार पोहोचली आहे. अशा जीवघेण्या आजाराशी लढण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार अनेक प्रयत्न करत असून यंत्रणाही सज्ज झाल्या आहेत. अशातच आता कोरोनाशी दोन हात करण्यासाठी उद्योजकही पुढे सरसावले आहेत.
भारतात अग्रगण्य असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरपर्सन आनंद महिंद्रा यांनी कोरना विरूद्धच्या लढ्याला मदत केली आहे. त्यांनी आपला संपूर्ण पगार कोरोनासाठीच्या उपाययोजनांसाठी लागणाऱ्या निधीला देण्याचे जाहीर केले आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून ट्वीट करत ही माहिती दिली आहे. एवढेच नाहीतर आपल्या सहकाऱ्यांनाही आपला पगार निधी म्हणून देण्याचे आवाहन केले आहे. तसेच पुढील महिन्यामध्ये आणखीन काही घोषणा करणार असल्याचेही महिंद्रा यांनी स्पष्ट केले आहे.
आनंद महिंद्रा यांनी कोरोनासाठीच्या लढ्याला निधी दिल्यानंतर आता वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी 100 कोटींचा मदतनिधी देत असल्याची घोषणा केली आहे. तर पेटीएमचे संस्थापक विजय शर्मा यांनी कोरोनाच्या लसीवरील संशोधकानासाठी 5 कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.