संशयितांकडून १०० तलवारी जप्त , २ अनधिकृत हॉटेल्स कायमच्या बंद
जळगाव (प्रतिनिधी):- बहुतांश गुन्हेगार रात्री हॉटेल्स , ढाब्यांवर खाणे – पिणे करीत गुन्ह्यांचे नियोजन करतात . हे लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील पोलसांनी २ मे रोजी रात्री सर्वत्र २१३ हॉटेल्स , ढाब्यांची अचानक तपासणी केली . या तपासणीत विविध ठिकाणच्या हॉटेल्स आणि ढाब्यांमधील संशयितांकडून १०० तलवारी जप्त करण्यात आल्या .

पोलिसांच्या विशेष पथकाने २ मे रोजी रात्री ९ ते ११ यावेळेत ही अचानक तपासणी केली . या सर्च ऑपरेशनमध्ये १ एनडीपीए कायद्यातील गुन्हेगारालाही ताब्यात घेण्यात येऊन त्याची चौकशी करण्यात आली . दारूबंदी कायद्यानुसार ११६ संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली . १०० तलवारी विविध संशयितांकडून जप्त करण्यात आल्या . या तपासणीमध्ये अनधिकृत आढळलेली २ हॉटेल्सही पोलिसांनी कायमची बंद केली आहेत . मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ५ संशयितांवरही कारवाई करण्यात आली . मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या एका संशयीतालाही ताब्यात घेण्यात आले .









