भुसावळ(प्रतिनिधी):- मध्य रेल्वेने प्रवाशांना सुरक्षित प्रवासाचा अनुभव देण्याच्या वचनबद्धतेतून, नेटवर्कवर विनातिकिट प्रवासावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्नांना वेग दिला आहे. प्रवाशांनी वैध तिकीटासह प्रवास करावा, रेल्वेच्या महसुलाचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने वाणिज्य विभागाने तिकीट तपासणी मोहिमा व्यापक आणि सघन केल्या आहेत. भुसावळ विभागात एप्रिलमध्ये १ लाख ९ हजार फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून १२.२३ कोटीं रुपयांच्या दंडाची वसुली तिकीट तपासणीसांच्या पथकांनी केली .

ही मोहीम विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल , वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार , सहायक वाणिज्य व्यवस्थापक (तिकीट तपासणी) श्री. पी. के. सिंह यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली. भुसावळ विभागात मेल-एक्सप्रेस, प्रवासी व विशेष गाड्यांमध्ये नियमितपणे व्यापक तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या जातात, यापूर्वी विभागाची सर्वोच्च मासिक कामगिरी मे २०२५ मध्ये ११.२० कोटी रुपये नोंदवली गेली होती. आता एप्रिल २०२६ मध्ये विभागाने १२.२३ कोटी रुपये महसूल उत्पन्नाची नोंद केली आहे.
या यशामागे तिकीट तपासणी मोहिमेची काटेकोर अंमलबजावणी, नियोजनबद्ध तपासणी, तसेच प्रवाशांमध्ये नियमांविषयी जनजागृती यांचा मोठा वाटा आहे. अनियमित प्रवासाच्या ४४,७३८ प्रकरणांमधून ₹२.१८ कोटी, विनातिकीट प्रवासाच्या एकूण ६३,६०८ प्रकरणांमधून ₹६.७० कोटी, एकूण ४०४ बुक न केलेल्या सामान प्रकरणांमधून ₹५० हजार दंड वसूल करण्यात आला आहे. विनातिकिट प्रवासाबाबत मध्य रेल्वेची शून्य-सहिष्णुता धोरण कायम आहे.









