डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुण्यात बदली
जळगाव (प्रतिनिधी) :- राज्याच्या गृह विभागाने पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल केले असून, जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता जळगाव जिल्ह्याची कमान श्रीकांत धिवरे सांभाळणार आहेत.

डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुणे येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात डॉ. रेड्डी यांनी जळगाव पोलीस दलासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि हिताचे निर्णय घेतले. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हयातील गुन्हेगारीवर मोठा अंकुश मिळवण्यात पोलिसांना यश आले होते. विशेषतः जिल्ह्यातील क्लिष्ट खून प्रकरणे आणि गंभीर गुन्ह्यांमधील आरोपींना जेरबंद करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीमुळे पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढले होते.
नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे हे आता जिल्ह्याचा पदभार स्वीकारतील. आगामी काळात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. डॉ. महेश्वर रेड्डी यांनी निर्माण केलेला गुन्हेगारीवरील वचक कायम ठेवण्यासाठी धिवरे यांना कशा प्रकारे पावले उचलावी लागतात, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.









