नशिराबादजवळ धडक देऊन अज्ञात चालक फरार
नशिराबाद (प्रतिनिधी) :- नशिराबाद येथील होमगार्ड ऑफिससमोर सेवा रस्त्यावर (सर्व्हिस रोड) झालेल्या भीषण अपघातात एक २२ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे. धडक देणारा अज्ञात दुचाकी चालक जखमीला मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून पसार झाला असून, नशिराबाद पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ललित एकनाथ सोनवणे (वय २२, रा. शेळगाव, ता. जळगाव) हे २६ एप्रिल रोजी रात्री १२:१५ वाजेच्या सुमारास त्यांच्या दुचाकीने (क्र. एमएच -१९ ईके -१३३९) नशिराबादकडून जळगावकडे जात होते. ते होमगार्ड ऑफिससमोरील सर्व्हिस रोडवरून जात असताना समोरून येणाऱ्या एका अज्ञात दुचाकीने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली.
अज्ञात दुचाकी चालकाने आपले वाहन भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे चालवून ललित यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली. या भीषण अपघातात ललित सोनवणे यांना गंभीर दुखापत झाली आहे. विशेष म्हणजे, अपघात झाल्यानंतर जखमीला दवाखान्यात दाखल करण्याऐवजी किंवा पोलिसांना घटनेची माहिती देण्याऐवजी, अज्ञात चालक अंधाराचा फायदा घेऊन तिथून पळून गेला.
जखमी ललित सोनवणे यांच्या जबाबावरून नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत विरणारे करीत आहे.









