धरणगाव तालुक्यात शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान
धरणगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील डॉ. हेडगेवार नगर शिवारात इलेक्ट्रिक डीपीवर शॉर्ट सर्किट झाल्याने लागलेल्या आगीत एका तरुण शेतकऱ्याचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीत ३ बिघे मका पिकासह ठिबक सिंचनाचे साहित्य जळून खाक झाले असून धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

धरणगाव येथील रहिवासी तुषार वसंत चौधरी (वय २७) यांचे डॉ. हेडगेवार नगर शिवारात गट क्रमांक ११७ मध्ये शेत आहे. २७ एप्रिल रोजी दुपारी १:५० वाजेच्या सुमारास शेतातील इलेक्ट्रिक डीपीवर अचानक शॉर्ट सर्किट झाले. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने डीपीमधून निघालेली ठिणगी थेट मक्याच्या पिकात पडली आणि क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले. तुषार चौधरी यांच्या एकूण ५ बिघे मका पिकापैकी सुमारे ३ बिघे क्षेत्रातील मका पूर्णपणे जळून खाक झाला आहे. पिकाव्यतिरिक्त शेतात अंथरलेल्या ठिबक सिंचनाच्या नळ्या आणि ६ पीव्हीसी पाईप देखील या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या भीषण आगीत शेतकऱ्याचे अंदाजे १,००,००० (एक लाख) रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती तुषार चौधरी यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून अकस्मात आग म्हणून नोंद करण्यात आली आहे. आगीची माहिती मिळताच परिसरातील शेतकऱ्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासनाकडून भरपाई मिळावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.









