मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा गावातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे गावात राहणारे ६२ वर्षीय वृद्ध व्यक्तीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असताना शनिवारी २२ जून रोजी पहाटे ३ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
सोपान काळू काळे (वय-६२ रा. हरताळे ता. मुक्ताईनगर) असे मयत वृध्दाचे नाव आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील सोपान काळे हे पत्नी, दोन मुले, दोन मुली यांच्यासह वास्तव्याला होते. दरम्यान त्यांनी शुक्रवारी दिनांक २१ जून रोजी रात्री ८ वाजता राहत्या घरात पिक फवारणीचे विषारी औषध घेतले. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
त्यांच्यावर उपचार सुरू असताना दिनांक २२ जून रोजी पहाटे ३ वाजता त्यांची प्राणज्योत मालविली. दरम्यान याबाबत जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सदर वृद्ध व्यक्ती या आजारी होत्या. आजाराला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.