उपमुख्यमंत्रीपद, मंत्र्यांच्या नावाबाबत पुन्हा गोपनीयता, राष्ट्रीय नेत्यांची उपस्थिती
मुंबई (वृत्तसेवा) :- राज्याचे १८ वे मुख्यमंत्री म्हणून उद्या दि. ५ डिसेम्बर रोजी संध्याकाळी ५. ३० वाजता मुंबईच्या आझाद मैदानावर देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे शपथ घेणार आहेत. तर उप मुख्यमंत्री म्हणून शिवसेना व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कोणते नेते शपथ घेतील तसेच मंत्री मात्र कोण राहील याबाबत मात्र बुधवारी दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत गोपनीयता बाळगण्यात आली आहे.
महायुतीचे सर्व नेत्यांनी बुधवारी दुपारी राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट घेऊन आमदारांच्या पाठबळाची पत्रे देऊन सत्तास्थापनेचा दावा केला. यानंतर पत्रकारांशी बोलताना भाजपचे विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस, शिवसेना अध्यक्ष एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित पवार यांनी माहिती दिली. आम्हाला राज्यपालांनी उद्या संध्याकाळी ५. ३० वाजता शपथविधीची वेळ दिली आहे. मी एकनाथ शिंदेंचे आभार मानतो कि त्यांच्यासह महायुतीतील सर्व घटक पक्षांनी मी मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी म्हणून राज्यपालांना समर्थनाचे पत्र दिले, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्रीपद हे तांत्रिक बाब आहे. मात्र आम्ही महायुतीतील सर्व घटक एकत्रितपणे राज्याच्या विकासाचा गाडा पुढे नेऊ. तसेच, एकनाथ शिंदेंना विनंती केली आहे की, आपण मंत्रिमंडळात राहावे, असे सांगून शपथविधीला पंतप्रधान मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा यांची उपस्थिती राहणार असल्याचेहि फडणवीस म्हणाले. अजित पवार यांनीहि आम्ही समर्थपणे राज्याला विकासाच्या दिशेने नेऊन देशातील नंबर १ चे राज्य बनवू असे सांगितले.
मतदारांचे आभार मानत एकनाथ शिंदे म्हणाले की, अडीच वर्षांपूर्वी मुख्यमंत्री म्हणून माझे नाव देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले त्याच जागेवर मी आता फडणवीस यांचे नाव आणि पाठींबा जाहीर करीत आहे. आगामी काळात आम्ही टीम म्हणून काम करणार आहोत.