भुसावळ तालुक्यातील निंभोरा येथील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) : महावितरण प्रशासनातर्फे वीज चोरी रोखण्यासाठी धडक मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत निंभोरा येथे विजेच्या तारांवर अनधिकृतरीत्या टाकलेले आकोडे काढत असताना विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याला दोघांनी मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तालुका पोलिसांत शासकीय कामात अडथळा आणल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महावितरणचे कर्मचारी समाधान भास्कर बुगले (वय ३४) हे मंगळवारी दिनांक १८ जून रोजी सकाळी साडेदहा ते साडेअकराच्या सुमारास गावातील अक्षय पाटील यांच्या घरासमोरील विद्युत तारेवरील अनधिकृतपणे टाकलेले तारेवरचे आकोडे पथकातील सहकाऱ्यांसह काढत होते. यावेळी संशयित आरोपी गणेश ऊर्फ गोल्या माधव सोनवणे व देवा (पूर्ण नाव माहीत नाही) यांनी समाधान बुगले व सहकाऱ्यांना शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणला.
गणेश सोनवणे याने त्याच्या हातातील धातूच्या कड्याने कर्मचारी बुगले यांच्या तोंडावर व डाव्या डोळ्याखाली मारले. महिला कर्मचारी आशा भटकर यांना सर्व्हिस वायरने व चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक बबन जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली. तपास सहायक फौजदार श्यामकुमार मोरे करीत आहेत.