यावल तालुक्यातील फैजपूर येथील घटना
यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील फैजपूर शहरातील आशिषनगरात बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी सव्वा लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना दिनांक १७ रोजी घडली. याप्रकरणी फैजपूर पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आशिषनगरातील रहिवासी भूषण सुतार हे दिनांक १७ ला सोमवारी सायंकाळी बाहेरगावी गेले होते. मंगळवारी सकाळी ६ वाजता घरी परतले असता त्यांना घराचा दरवाजा तुटलेला दिसला. चोरट्यांनी घरातील सामान अस्ताव्यस्त फेकून कपाटातील १ लाख १० हजार रुपयाची रोख रक्कम तसेच १८ हजार रुपयांचे सोन्याचे सोने-चांदीचे दागिने असा १ लाख २८ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याचे दिसून आले.
भूषण सुतार यांनी फैजपूर पोलीस स्टेशनला धाव घेऊन तक्रार दाखल केली. सहायक पोलिस निरीक्षक नीलेश वाघ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. भूषण सुतार यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान जिल्हाभरात घरफोड्यांचे सत्र सुरूच असून त्यावर पोलीस दलाने अंकुश आणण्याची गरज व्यक्त केली जात आहे.