जळगावातील चित्रा चौकात भीषण अपघात
जळगाव ( प्रतिनिधी ):- शहरातील अत्यंत गजबजलेल्या चित्रा चौक परिसरात भरधाव वेगाने येणाऱ्या एका लाल रंगाच्या बुलेटने धडक दिल्याने महानगरपालिकेचे कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर बुलेट चालक घटनास्थळावरून पसार झाला असून, याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

राजू शंकर सोनवणे (वय ५६, रा. इंजिनिअरिंग कॉलेजच्या मागे, बांभोरी, ता. जळगाव) हे जळगाव महानगरपालिकेत नोकरीला आहेत. सोमवारी, १३ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास सोनवणे हे आपल्या ‘डिस्कव्हर’ मोटरसायकलने (क्रमांक एमएच-१९ बीएच-६००१) नवजीवन शॉपच्या गल्लीतून चित्रा चौकाकडे जात होते. त्याच वेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून येणाऱ्या एका लाल रंगाच्या बुलेट (क्रमांक २६१५, पूर्ण क्रमांक माहीत नाही) वरील अज्ञात चालकाने आपले वाहन अत्यंत भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवून सोनवणे यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली.
या भीषण धडकेत राजू सोनवणे यांच्या उजव्या पायाला जबर दुखापत झाली आहे. अपघात झाल्यानंतर संबंधित बुलेट चालक जखमीला कोणतीही मदत न करता आपल्या वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी जखमी सोनवणे यांनी २० एप्रिल रोजी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली.
सोनवणे यांच्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलिसांनी अज्ञात बुलेट चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास जळगाव शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सुधीर साळवे या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून संबंधित लाल रंगाच्या बुलेटचा आणि त्याच्या चालकाचा शोध घेत आहेत.









