अमळनेर तालुक्यातील कलाली येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील कलाली येथे एका महिलेस व तिच्या मुलाला जातीवाचक शिवीगाळ करून तसेच, मारहाण केल्याप्रकरणी वकिलासह त्यांच्या मुलावर मारवाड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुर्गाबाई भगवान भिल (वय ५०, रा. कलाली ता. अमळनेर) या महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेचा मुलगा सुदाम भगवान भिल हा जुन्या ग्रामपंचायतीजवळ मजुरांसोबत बसलेला होता. तेव्हा संशयित आरोपी ऍड. पद्माकर पाटील व त्यांचा मुलगा दादू यांनी त्याला शेतात कामासाठी येण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून त्याला शिवीगाळ केली. तसेच त्याला बसलेल्या वाहनातून बाहेर काढीत मारहाण करू लागले.
तेथे सुदाम भिल याची आई फिर्यादी महिला आल्या असता त्यांनाही संशयित ऍड. पद्माकर पाटील व त्यांच्या मुलाने मारहाण व शिवीगाळ केली. त्यामुळे फिर्यादी महिलेने मारवाड पोलीस स्टेशन गाठून शुक्रवारी २१ रोजी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मारवड पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. तपास स्वतः डीवायएसपी सुनील नंदवाळकर करीत आहेत.