स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल
जळगाव : स्मार्ट मीटर बसवलेल्या ग्राहकांचा थकबाकीपोटी महावितरणने वीजपुरवठा खंडित केला. मात्र या ग्राहकांनी वीजबिल न भरता परस्पर जोडणी घेऊन वीजचोरी केली. शहरातील अशा ३ ग्राहकांवर महावितरणने थेट पोलिसांत गुन्हे दाखल केले आहेत.
श्रीराम चौकातील प्रतिभा रितेश पवार या ग्राहकाचा वीजपुरवठा थकबाकीसाठी स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट (आपोआप खंडित) केलेला होता. मात्र त्यानंतरही त्यांनी थकबाकी केली नाही. महावितरणच्या पथकाने तपासणी केली असता या ग्राहकाने घरासमोर असलेल्या लघुदाब वीज वाहिनीवर आकडा टाकून वीजचोरी केल्याचे आढळले. या ग्राहकाने ९ हजार ७०० रुपयांची वीजचोरी केली. दुसऱ्या प्रकरणात आशाबाबा कॉलनीतील लक्ष्मी भानुदास बागडे या ग्राहकाने थकबाकीसाठी स्मार्ट मीटरद्वारे वीजपुरवठा खंडित असतानाही वीज वाहिनीवर आकडा टाकून अनधिकृत वीजवापर केला. या ग्राहकाने ३४ हजार रुपयांची वीजचोरी केली. तर शिव कॉलनीतील स्वप्नील प्रशांत सैंदाणे यानेही वीजपुरवठा थकबाकीची खंडित असताना अनधिकृपणे वीजवापर केला. त्याने ३८ हजार ८५० रुपयांची वीजचोरी केली. महावितरणचे उपकार्यकारी अभियंता दिलीप मराठे यांच्या फिर्यादीवरून या ३ जणांवर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात ७ ऑगस्ट रोजी भारतीय विद्युत कायद्याच्या कलाम १३५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
दरम्यान, थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांनी आपली वीजबिले तातडीने भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केला आहे. थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची पडताळणी करण्यासाठी महावितरणने पथके स्थापन केली आहेत. वीजपुरवठा परस्पर जोडल्याचे या पथकांना आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे. तसेच अनधिकृतपणे वीजपुरवठा जोडल्यास प्राणांतिक अपघाताचाही धोका आहे. त्यामुळे वीजपुरवठा अनधिकृतरीत्या जोडू नका. वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना शेजाऱ्यांनीही अनधिकृतरीत्या वीजपुरवठा देऊ नये. नसता त्यांचाही वीजपुरवठा खंडित करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे महावितरणने कळवले आहे.











