मुख्य अभियंता कैलास हुमणे यांचे आवाहन
जळगाव (प्रतिनिधी) :- रब्बीचा हंगाम सुरु असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात कृषीपंप वापरण्यात येत आहेत. कृषीपंपाना सुरळीत आणि अखंडित वीज पुरवठा सुरु आहे. त्यासाठी महावितरणकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. सोबतच शेतकरी बांधवांनीही अधिकृतपणे वीज पुरवठा घ्यावा. कृषीपंपाला ॲटोस्विच न वापरता कॅपॅसिटरचा प्राधान्याने वापर करावा, असे आवाहन जळगांव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी केले आहे.
बऱ्याच ठिकाणी कृषीपंपांना ॲटोस्विच लावल्याचे निदर्शनास आलेले आहे. ॲटोस्विचमुळे विद्युत पुरवठा सुर झाल्यानंतर एकाच वेळी परिसरातील सर्वच्या सर्व विद्युत मोटारी सुरु होतात. परिणामी एकाचवेळी अचानकपणे त्याचा भार सर्व मोटारींसह रोहित्रावर येतो आणि ते नादुरुस्त होतात. त्यामुळे सुरळीत विद्युत पुरवठ्यासाठी ॲटोस्विचचा वापर टाळणे आवश्यक आहे. शिवाय, विद्युतपंपाना कॅपॅसिटर लावणे बंधनकारक आहे. कॅपॅसिटर हा रिॲक्टीव्ह पॉवर नियंत्रित करणारा प्रभावी घटक आहे. तो मोटारींना बसविल्याने मोटारींसह विद्युत वितरण रोहित्र जळण्याचे प्रमाण नियंत्रित होते. त्यामुळे शेतकऱ्यांसह महावितरणचीही आर्थिक हानी होणार नाही. आर्थिक हानी टाळण्याबरोबरच गैरसोयही टळेल. कॅपॅसिटरमुळे कमी विद्युत दाबावर मोटारी पूर्ण क्षमतेने चालतील.
कॅपॅसिटर शिवाय विद्युतपंप वापरल्याने अधिक ॲम्पीअर विजेचा वापर होऊन पंप अधिक गरम होतो व लवकर जळतो. आपल्याला असाही अनुभव आहे की, जसजसा विद्युत लाईनवरील लोड (लाईनचा विद्युत प्रवाह) वाढत जातो, तसतसा लाईनचा विद्युत दाब (व्होल्टेज) कमी कमी होत जातो (म्हणजेच व्होल्टेज ड्रॉप वाढून व्होल्टेज कमी कमी होत जातो.) अशा वेळी विद्युत मंडलामध्ये (सर्किटमध्ये) कॅपॅसिटर्स जोडून लाईनवरील लोड तितकाच राहून विद्युत प्रवाह (करंट) मात्र कमी होतो. त्यामुळे विद्युत दाबामुळे सुधारणा होऊन लाईनचा विद्युत दाब (व्होल्टेज) वाढतो. वीज ग्राहकांना योग्य प्रमाणात विद्युत दाब मिळण्यास मदत होते.
बाजारात वेगवेगळ्या कंपनीनुसार कॅपॅसिटरची अत्याल्प दरात उपलब्धता आहे. मोटारींच्या एचपी नुसार योग्य त्या क्षमतेचा कॅपॅसिटर बसविल्याने वापरण्यात येणारा वीज भार कमी होतो. चागंल्या दर्जाचे कॅपॅसिटर मोटारी तसेच रोहित्रांचेही चांगले सरंक्षण करु शकतात. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी मोटारींना कॅपॅसिटर लावून आपल्या मोटरींचे आणि रोहित्रांचे होणारे नुकसान टाळावे. असे आवाहन मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी केले आहे.