भुसावळ येथील पाटीलमळा परिसरातील घटना ; अल्पवयीन संशयित आरोपी ताब्यात
भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील पाटीलमळा परिसरात काल गुरुवारी रात्री एका ३५ वर्षीय रेल्वे कर्मचाऱ्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. तुषार गोविंद सोनवणे (वय ३५, समता नगर, भुसावळ) असे मृताचे नाव असून या प्रकरणी एका १७ वर्षीच्या अल्पवयीन संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संशयित अल्पवयीन आरोपी त्याची आई आणि मयत तुषार सोनवणे यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांचा राग मनात धरून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने काही दिवसांपूर्वीच तुषार यांच्या हत्येचा कट
रचला होता.

दि. १० सप्टेंबर रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास संशयित अल्पवयीन मुलाने मयत तुषार सोनवणे याला फोन करून सांगितले माझे वडील नाशिकला गेले आहे. असल्याचे सांगितले. त्यानंतर तो स्वतःच्या (एमएच १९ सीएच १४०५) दुचाकीवर पाटीलमळा येथून तुषार याला घेण्यासाठी गेला. परत तुषारला घेऊन घराकडे येत असताना अल्पवयीन संशियीत मुलांने मुद्दाम तुषार याला दुचाकी चालविण्यास सांगितले. तुषार दुचाकी चालवत असताना त्याच्या घराजवळ आल्यानंतर संशियीत अल्पवयीन आरोपीने पाठीमागून डोक्याखाली व पाठीवर धारदार चाकूने सपासप वार केले.
दरम्यान घटनेनंतर तत्काळ ११२ या आपत्कालीन क्रमांकावर फोन करण्यात आला. माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेत तुषारला रुग्णवाहिकेतून ट्रॉमा केअर सेंटर, भुसावळ येथे नेण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्याचवेळी जळगाव गुन्हे शाखेचे पथक शहरातच असल्याने त्यांनी तत्परतेने पाठलाग करत संशयिताला आरोपी अल्पवयीन मुलाला काही अंतरावरून ताब्यात घेतले. मयत तुषार सोनवणे हा भुसावळ रेल्वेत कार्यरत होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. पुरावे संकलित करण्यासाठी फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले. तसेच अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांनीही घटनास्थळी येऊन परिस्थितीची पाहणी केली.
दरम्यान, पोळा सण शहरात शांततेत पार पडत असतानाच रात्रीच्या सुमारास घडलेल्या या निर्घृण हत्येमुळे भुसावळ शहरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४४७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सपोनि राहुल तायडे करीत आहेत. घटनेनंतर परिसरात सध्या शांतता आहे








