४६.१५४ किलो अंम्फेटामाइन व मेथाक्वालोनचा नाश; नियमानुसार पार पडली प्रक्रिया
जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव जिल्ह्यातील दोन गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले तब्बल ६५ कोटी ७० लाख रुपये किमतीचे ४६.१५४ ग्रॅम वजनाचे अंम्फेटामाइन (Amphetamine) व मेथाक्वालोन (Methaqualone) हे अंमली पदार्थ नियमानुसार नष्ट करण्यात आले. जळगाव पोलिसांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित आणि अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली जप्त अंमली पदार्थांचा नाश करण्याची कार्यवाही करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, केंद्र सरकारची मार्गदर्शक तत्त्वे तसेच संबंधित विभागांच्या आदेशांनुसार ही प्रक्रिया पार पडली.
दिनांक ९ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या स्ट्राँग रूममधून जप्त अंमली पदार्थ सीलबंद अवस्थेत बाहेर काढण्यात आले. यावेळी जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक गौतम उत्तम बावस्कर उपस्थित होते. त्यानंतर हे पदार्थ पुणे जिल्ह्यातील रांजणगाव, ता. शिरूर येथील M/s Maharashtra Enviro Power Ltd. या संस्थेकडे नाश करण्यासाठी पाठविण्यात आले.
या दोन गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांची एकूण किंमत ६५ कोटी ७० लाख रुपये असल्याचे पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे. संबंधित अंमली पदार्थांचा नाश जिल्हास्तरीय अंमली पदार्थ मुद्देमाल नाश समितीच्या मान्यतेनंतर करण्यात आला. नाश प्रक्रियेचे संपूर्ण व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय अंमली पदार्थ मुद्देमाल नाश समितीच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी संजय गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि जप्त केलेल्या पदार्थांची नियमानुसार विल्हेवाट लावण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून ही कार्यवाही करण्यात आली.
नाश प्रक्रियेत सहभागी अधिकारी व कर्मचारी :
वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक श्री. सोपान गोरे, पोलिस हेड कॉन्स्टेबल श्री. संदीप पाटील, श्री. राहुल बैसाणे, पोलिस कॉन्स्टेबल श्री. सागर पाटील, श्री. उमाकांत पाटील, तसेच सशस्त्र पोलिस गार्डचे पोलिस नाईक श्री. शैलेंद्र पाटील, पोलिस कॉन्स्टेबल श्री. रविंद्र बच्छे, श्री. आशुतोष सोनवणे व श्री. केतन सूर्यवंशी यांनी नाश प्रक्रियेत सहभाग घेतला.
तसेच शासकीय छायाचित्रकार पोलिस हेड कॉन्स्टेबल श्री. जयंत चौधरी यांनी नाश प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण केले. पंच म्हणून श्री. सुनील बाबुराव विसावे व श्री. संजय गोविंद रंधे उपस्थित होते.






